दर्जेदार व सर्वंकष उच्च शिक्षण : शाश्वत विकासाची गुरूकिल्ली

August 6, 2019
No Comments

भारता सारख्या महाकाय लोकसंख्येच्या देशांत तरुणाईचे असलेले सर्वात अधिक प्रमाण ही इतर सर्व देशांना हेवा वाटावा अशीच गोष्ट होय. सध्याच्या ज्ञान युगात तर, ज्ञानामुळे मानवी क्षमतेत प्रचंड वाढ शक्य असल्याने, भारताची संभाव्य क्षमता  साऱ्या जगाला हेवा वाटावा अशीच आहे. अर्थात देशाची ही संभाव्य क्षमता पूर्णत: प्रत्यक्षात यायची तर, ऊकृष्ट मानव विकास कार्यक्रमाद्वारे, प्रत्येकाचे व्यक्तिमत्व आजच्या परस्परावलंबी व स्पर्धात्मक जगात समाजाला सतत प्रगतीपथावर ठेवण्य्यास पूर्णपणे सक्षम करणे हे अत्यंत आवश्यकच होय. येवढेच नव्हे तर ती आपली प्रथम प्राथमिकता असायला हवी.

या विषयाचा आवाका अर्थातच खूप मोठा आहे. उच्च शिक्षणा पुरतां विचार करायचा झाला तरी हा विचार अनेक द्रुष्टीकोनातून करायला हवा. यांतील काही थोड्याच मुद्यांचा विचार इथे प्रस्तुत आहे. ते असे;

 

 

  1. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेतां आपली दरडोई नैसर्गिक संसाधने खूपच तुटपुंजी आहेत. मानव संसाधनाच्या बाबतीत मात्र आपण खूप भाग्यवान आहोत. आजच्या स्पर्धात्मक ज्ञानयुगात आपणांस पुढे राहायचे झाल्यास दर्जेदार उच्च शिक्षणा द्वारे सक्षम मानव संसाधन निर्मितीला पर्याय नाही.
  2. आपल्या येथे शिक्षणाचा सरासरी दर्जा मात्र अपेक्षे पेक्षा बराच खालावलेला दिसतो.
  3. आपल्या देशाची जवळपास दोन तृतियांश लोकसंख्या ग्रामीण भागांत राहते. आज ग्रामीण व शहरी भागांत उपलब्ध असलेल्या उच्च शिक्षणाच्या सुविधां मध्ये संख्यात्मक द्रुष्ट्या तसेच अधिक महत्वाचे म्हणजे दर्जात्मक द्रुष्ट्या खूप तफावत आढळते.
  4. उच्च शिक्षण केंद्रे ही ज्ञान साधना व ज्ञानवृद्धीसाठी पोषक वातावरण सांभाळणारी विद्यालये असायला हवीत. समाजिक प्रक्रियांचा वेध घेऊन त्यासाठी त्यांना योगदान व योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता व विश्वासार्हता या केंद्रांनी साध्य करायला हवी. केलेल्या अश्या ज्ञानार्जनाचा समाजाच्या किंवा देशाच्या विकासात उपयोग करण्याची क्षमता साध्य करण्याची प्रत्यक्ष संधी विद्यार्थ्यांना मिळण्याची व्यवस्था या केंद्रांनी निर्माण करावयास हवी.
  5. या साठी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचा ( या मध्ये उद्योग, विकास कार्यक्रमांची आखणी करणाऱ्या संस्था, सामाजिक विकास कार्यक्रमांत गुंतलेल्या संस्था, संशोधन संस्था, अश्या सर्व घटकांचा समावेश असावा ) उच्च शिक्षण केंद्रांच्या कामांत ( पाठ्यक्रमाची आखणी, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, प्रकल्प आखणी व राबवणे इत्यादी ) प्रत्यक्ष सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे.
  6. उच्च शिक्षणाचा प्रमुख ऊद्देश्य आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे सखोल आकलन, व समोर येणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता निर्माण करणे हा असावा. या साठी अधिकांश वेळी एका पेक्षा अधिक विद्याशाखांची कांस धरणे अपरिहार्य ठरते. उच्च शिक्षण केंद्रांत मुक्त वातावरण असणे म्हणूनच अत्यावश्यक ठरते.

 

 

वरील मुद्दे उच्च शिक्षणाच्या संदर्भात ग्रामीण व शहरी अश्या दोन्ही भागांत उपयुक्त असले तरी आपल्या देशाच्या शाश्वत विकासाच्या द्रुष्टीने ग्रामीण क्षेत्राकडे प्राथमिकतेने लक्ष पुरवणे मला अधिक आवश्यक वाटते. या साठी खालील बाबींवर लक्ष पुरवणे आवश्यक आहे असे मला वाटते.

 

 

  1. देशांचा संतुलित विकास साधायचा तर झपाट्याने ग्रामीण विकास साध्य करणे अनिवार्य होय.
  2. ग्रामीण विकासाला लागणाऱ्या गुंतवणूकी ची सुरूवात जरी राष्ट्रीय बजेट मधून करणे अपरिहार्य असले तरी ग्रामीण विकास अधिक गतीने साध्य करायचा झाल्यास ग्रामीण भागांत गुंतवणूक इतर पर्यायांपेक्षा अधिक आकर्षक बनली पाहिजे.
  3. समाजात संपत्तीवृद्धीची न्यायपूर्ण वाटणी व्हायची तर उद्योगांच्या संरचनेत व कार्यपद्धतीत गरीब ग्रामीण प्राथमिक उत्पादकांची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणे व त्यांचा एकूण व्यवसायात प्रभावी सहभाग असणे आवश्यक ठरते.
  4. प्राथमिक उत्पादकांची उत्पादन क्षमता (आणि पर्यायाने उत्पन्न) वाढण्या साठी उचित तंत्रज्ञानाची जोड मिळण्याची व्यवस्था व वातावरण निर्माण करावे लागेल. यासाठी आवश्यक प्रशिक्षणाच्या सोयी निर्माण कराव्या लागतील.
  5. तंत्रज्ञान हे सतत विकसित होत असते. स्थिर तंत्रज्ञान हे हळूहळू कालबाह्य होते. कोठलेही तंत्रज्ञान त्यात सतत सुधार करत राहिल्या शिवाय बाजारपेठेतील स्पर्धेत टिकाव धरू शकत नाही.
  6. असा तंत्रज्ञान विकास स्थानिक गरजानुरूप व्हायचा तर तो त्या परिसरातच होणे अधिक श्रेयस्कर. हे काम शाश्वत स्वरूपात व्हायचे तर स्थानिक शिक्षण व संशोधन संस्थांचा सहभाग अनिवार्य ठरतो. या साठी स्थानिक उच्च शिक्षण संस्थांनी पुढे यावयास हवे. याने शाश्वत विकासाला चालना तर मिळेलच पण पर्यायाने शिक्षण व्यवस्था पण अधिक प्रगल्भ होण्यास मदत होईल.

 

मला वाटत ग्रामीण परिसरांत अश्या प्रकारच उच्च शिक्षण, विकास व उपयुक्त तंत्रज्ञान निर्मिती कडे एकत्रितपणे बधणार वातावरण निर्माण करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी. अश्या  ज्ञानाधिष्टीत वातावरण निर्मितीची सुरूवात करतांना इतर ठिकाणी उपलब्ध उपयुक्त तंत्रज्ञान व ग्रामीण विकासा बद्दल तळमळ असलेले तंत्रज्ञ यांना ग्रामीण भागात आणून रुजवणे खूप उपयुक्त ठरेल. शहरी सुविधा, शहरी भागांत पुढे असलेला ज्ञान विकास, तेथे उपलब्ध तंत्रज्ञान हे सर्व ग्रामीण परिसरांकडे वळवणार वातावरण आपण निर्माण करायला हव. सिलेज संकल्पने मागे हाच विचार आहे. (CILLAGE is a knowledge bridge between a city and a village and its surroundings that leads to a sustainable eco-system for holistic development of rural neighbourhood.) अश्या प्रकारचा सिलेज स्थापनेचा एक प्रयोग पंढरपूर जवळ गोपालपूर येथे करण्यात आला आहे. (पहा Gopalpur CILLAGE in Science Based Development)

 

आतां आपण ज्ञानयुगात वाटचाल करत आहोत. ज्ञानाधिष्टीत तंत्रज्ञान विकेंद्रित स्वरूपात व लोकहितार्थ मोठ्या प्रमाणावर फायदेशीर व्यवसाय करण्यास खूपच उपकारक ठरू शकते. ग्रामीण भागांत शेती व शहरी भागांत उद्योग अशी विभागणी आतां कालबाह्य ठरणार आहे. संपत्ती च्या  निर्मितीचे दरडोई प्रमाण ग्रामीण व शहरी भागांत सारखेच असू शकते हे दाखवून देण्याची वेळ आतां आलेली आहे. किंबहुना ग्रामीण भागांत शेतीही होऊ शकते जी शहरी भागांत होणे कठिण आहे व त्यामुळे  ग्रामीण भागांत तत्वत: अधिक दरडोई उत्पन्न संभवू शकते.

 

अर्थात हे सर्व साध्य करायचे म्हणजे ग्रामीण भागातील मानव संसाधन विकासाचा कार्यक्रम पण त्या अनुरूप असायला हवा. येथे केवळ उच्च शिक्षणाचाच नाही तर सर्व स्तरातील शिक्षणाचा विचार व्हायला हवा. गोपालपूर सिलेज मध्ये ‘शिक्षण पंढरी’ ह्या ज्ञान रचने वर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमाने सर्वत्र पोचू शकणाऱ्या शालेय शिक्षण कार्यक्रमाचाही समावेश आहे.

 

अर्थात सधन सुविचारी समता गाठण्या साठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तसेच ह्या मोडेल चा सुद्रुढपणा पण वेगवेगळ्या परिस्थितीत तपासून पहावयास हवा. पुणे विद्यापीठा सारख्या पुरोगामी विद्यापीठाने या कामी पुढाकार घेतला तर खूप काही होण्यासारखे आहे. तसे होईल अशी मी अपेक्षा बाळगतो.

 

——————————————————————————————

Reference:

 

  1. Anil Kakodkar, Babruvahan Ronge, Ajit Patankar, Smita Mule and Prashant Pawar ‘A concept of knowledge and technology enabled empowerment of rural Indian villages’ CURRENT SCIENCE, Vol. 112, No.4, 25 February 2017
Tags:

Leave a Reply

(required)

(required)